गडचिरोलीविदर्भ

पुराच्या संकटात गडचिरोली पोलिसांची तत्परता : अंगणवाडी सेविकेचे हेलिकॉप्टरने वैद्यकीय स्थलांतर

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्याचा भामरागडसह एकूण ११२ गावांसोबतचा संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये, भामरागडमधील एका अंगणवाडी सेविकेचा जीव वाचवण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे माणूसकीचे दर्शन घडले आहे.

भामरागड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर होती. रस्त्यांचा संपर्क तुटल्यामुळे त्यांना तात्काळ उपचारांसाठी गडचिरोलीला हलवणे आवश्यक होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी त्वरित पवन हंस हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि ते भामरागडकडे रवाना केले. हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्या धोक्याबाहेर आहेत.

गडचिरोली पोलिसांच्या या तत्परतेमुळे अंगणवाडी सेविकेचा जीव वाचला. या बचावकार्यात जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, तसेच महसूल विभागाचे कर्मचारी आणि पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट डीआयजी श्रीनिवास व सहपायलट आशिष पॉल यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button