रंगयापल्ली ते पोचमपल्ली मार्गाला पडल्या तडा
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह

सिरोंचा : मोठा गाजावाजा करीत सिरोंचा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत रस्त्याचे काम जोमाने गेल्या दिड वर्षापासून सुरू आहे. सिरोंचा पासून कारसपली पर्यंत १५ किमी मार्गाचे काम पूर्ण झाले असून कारसपली ते रंगयापल्ली सोडून रंगयापल्ली पासून बामणीकडे काम चालू आहे. अद्यापही बरेचसे काम क्षिल्लक आहे. सुरुवातीपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम वादग्रस्त ठरले असतांना पुन्हा यात भर पडली आहे. या सिरोंचा ते आलापल्ली महामार्गाअंतर्गत येत असलेल्या पोचमपल्ली फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गाला अल्पावधीतच अनेक ठिकाणी तडा गेल्याने सदर बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरविण्याच्या राज्याचा संकल्पनेअंतर्गत आदिवासीबहूल, नक्षलप्रभावित, उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यातही राष्ट्रीय महामार्गाला मान्यता प्रदान करण्यात आली. याअंतर्गत आष्टी-आलापल्ली-सिरोंचा जाणाऱ्या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत काम हाती घेण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामकाजामुळे कामाच्या प्रारंभीपासून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आली. नागरीक व विविध सामाजिक संघटनाच्या वाढता रोष लक्षात घेता कामाला गती देण्यात आली. याच निकृष्टतेची प्रचिती सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावरुन आली आहे. सिरोंचा मार्गावर असलेल्या पोचमपल्ली फाटाजवळील रस्त्याला तडे गेल्याने कंत्राटदाराच्या कामकाजावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.



