गडचिरोलीविदर्भ

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ‘मौशिखांब’ ग्रामपंचायतीचे बळ; मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत सुसज्ज अभ्यासिका सुरू!

स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी गावातच मिळणार शहरासारख्या सुविधा ; परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

गडचिरोली : ग्रामीण भागातील गुणवत्तावान विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी आता शहराकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. तालुक्यातील मौशिखांब ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत ‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियान’ अंतर्गत गावातच एक सुसज्ज आणि अत्याधुनिक अभ्यासिका (Study Room) सुरू केली आहे. ग्रामीण शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची दारे उघडण्यास मदत करणार आहे.

अनेकदा ग्रामीण भागात बुद्धिमत्ता असूनही केवळ शांत वातावरण, बसण्यासाठी पुरेशी जागा आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधांअभावी विद्यार्थी मागे पडतात. शहरांमधील खाजगी वाचनालयांचे शुल्क परवडत नसल्याने अनेकांचे शिक्षण अर्धवट सुटते. हीच अडचण ओळखून ग्रामपंचायतीने नवीन अभ्यासिकेत प्रशस्त बैठक व्यवस्था: एकाग्रतेने अभ्यासासाठी स्वतंत्र डेस्क आणि खुर्च्या. पायाभूत सोयी: अखंडित प्रकाशयोजना, पंखे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. सुरक्षित वातावरण: विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित अभ्यासाची जागा. या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

अभ्यासिकेच्या शुभारंभप्रसंगी सरपंच रंजिता पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “या अभ्यासिकेचा उपयोग केवळ वाचनासाठी न करता, स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून गावाचे नाव उंचावण्यासाठी करा,” असे आवाहन त्यांनी केले. उपसरपंच रुपाली गांधरवार यांनी हा उपक्रम गावाच्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी खुशाल नेवारे यांनी प्रशासकीय भूमिकेतून माहिती दिली की, शासनाच्या विविध योजनांचा निधी विधायक कामांसाठी वापरून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

या प्रेरणादायी सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, सुधाकर गेडाम तसेच तंटामुक्ती अध्यक्ष गणेश दहलकर उपस्थित होते. दहलकर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. मौशिखांब ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, इतर ग्रामपंचायतींसाठी हा ‘रोल मॉडेल’ ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button