गडचिरोलीविदर्भ

लाहेरी येथील शासकीय विद्यालयात ५० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

भामरागड : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ कि.मी. अंतरावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. शाळेत सकाळचे जेवण केल्यानंतर ५० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे भोजन केले. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सर्व विद्यार्थी प्रार्थना आणि परिपाठासाठी एकत्र जमले होते. प्रार्थना सुरू असतानाच एका विद्यार्थ्याला अचानक मळमळ होऊन उलट्या होऊ लागल्या. शिक्षकांनी तत्परता दाखवत त्याला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, काही वेळातच एकामागून एक अशा अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. सुरुवातीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर, परिस्थिती अधिक खालावू नये म्हणून सर्व बाधित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५० हून अधिक विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

विषबाधा नेमकी कशामुळे झाली? अन्नाचा दर्जा काय होता? आणि याला जबाबदार कोण? या बाबींचा शोध घेण्यासाठी अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button