गडचिरोलीविदर्भ

एटापल्लीत शिवजन्मोत्सव सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह ; अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

एटापल्ली : स्थानिक राजमुद्रा फाउंडेशन, समर्पण ट्रस्ट आणि श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ एटापल्ली शहरात अत्यंत देदिप्यमान आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

या भव्य महोत्सवाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवरायांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम आणि प्रमुख पाहुण्या म्हणून एटापल्ली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रेखा मोहुर्ले यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला एक वेगळीच रंगत आली होती.

शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी यांनी भक्तीगीत आणि भजन संध्या सादर केली. त्यांच्या सुमधुर आवाजातील भक्तीगीतांनी उपस्थित भाविक आणि शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाले. शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या गीतांनी अवघा परिसर भारावून गेला होता. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने अतिशय उत्साहात करण्यात आली. शिवरायांचा जयघोष आणि राज्यगीताच्या सुरांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत मामीडवार, समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, अमोल गजाडीवार, राहुल कुळमेथे, संपत पैडाकुलवार, मोहन नामेवार, बंटी मोहुर्ले, प्रशांत आत्राम, राकेश हिरा, महेश पुल्लुरवार, महेंद्र सुल्वावार, प्रशांत तोडेवार यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी एटापल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button