भरधाव ट्रकने आठ वर्षीय बालिकेला चिरडले

महादुल्यातील घटना ; घटनास्थळी नागरिकांचा तीव्र संताप
नागपूर : सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या एका आठ वर्षीय बालिकेला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महादुला सर्व्हिस रोडवर शनिवारी (दि. १४) दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घडली. संजना झाकणीकर (८, रा. कव्वापारा महादुला, ता. कामठी) असे मृत बालिकेचे नाव आहे. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करीत मार्गावरील बेदरकार वाहतुकीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
संजना आपल्या मैत्रिणीसह जयभीमनगरकडून सर्व्हिस रोड ओलांडत असताना, नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच- ४०/सीएम-१६४१ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने तिला जोरात धडक दिली. नागरिकांनी तत्काळ तिच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र तिला गंभीररीत्या दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
या अपघातानंतर रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करीत ट्रकचालकावर कठोर कारवाईची मागणी केली. महादुला येथे सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण, वाहनांची पार्किंग व होणारी जड वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करीत जड वाहतूक तसेच बेलगाम वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी रेटून धरली.



