
मुख्याध्यापिका असलेल्या आईसमोरच चिमुकल्या निरालीचा मृत्यू; जीर्ण गेटच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नडले
तिरोडा : तालुक्यातील नगरपरिषदद्वारा संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला येथे शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शाळेचा मुख्य प्रवेशद्वार अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव कुमारी निराली मनीष चाफले (वय ११) असे आहे. शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत असताना अचानक गेट कोसळले. यात निराली गेटखाली दबली जाऊन गंभीर जखमी झाली. तिला तातडीने तिरोड्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गेट गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्या गेटपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.
निराली ही अत्यंत हुशार व गुणवंत विद्यार्थिनी होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे तिचा सत्कार करण्यात आला होता. तिच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक वर्तुळातही शोक व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, निरालीची आई शुभांगी चौधरी चाफले या त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



