
आदिवासी विकास महामंडळाचा उपक्रम; मध्यस्थांची साखळी मोडीत काढून शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसा
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित (नाशिक) अंतर्गत प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व उप-प्रादेशिक कार्यालय (घोट) यांच्या संयुक्त विद्यमाने रेगडी येथे हंगाम २०२५–२६ साठी आधारभूत किंमत धान खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ करण्यात आला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून आणि धान मोजमाप काट्याचे पूजन करून या केंद्राचे उद्घाटन झाले.
उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. अशोक नेते यांनी या केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “रेगडी आणि परिसरातील शेतकरी बांधवांना आपल्या घामाचे दाम मिळवण्यासाठी आता लांबचा प्रवास करण्याची गरज नाही. या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या हमीभावाचा (MSP) थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल. यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मोबदला जमा होईल.”
तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या ऐतिहासिक ‘बोनस’ निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. हा बोनस शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्यास महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस, नगरसेवक आशिष पिपरे, आदिवासी विकास महा. मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सांभारे, उपप्रादेशिक व्यवस्थापक भगत, भाजपाचे ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, रेगडीच्या सरपंच सुरेखा गेडाम, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, धान खरेदी केंद्राचे उपनिरीक्षक पेंदाम, केंद्र प्रमुख लाटकरी, सि. पी. हलदार, विविध सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष तलांडे, माजी सरपंच बाजीराव गावडे, भाऊजी नेवारे, मुरारी नरोटे यांच्यासह आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी तसेच रेगडी परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेगडी येथील हे केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरातील आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. “शासकीय हमीभाव आणि वरून मिळणारा बोनस यामुळे यंदाची शेती फायदेशीर ठरेल,” अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्राचे उपनिरीक्षक पेंदामजी आणि केंद्र प्रमुख लाटकरी यांनी केंद्राच्या कामकाजाची माहिती देऊन शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी आवाहन केले.



