
नागेपल्ली येथे अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मुख्य गाव म्हणून ओळख असलेल्या नागेपल्ली गावातून अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी ग्रामसभेत विविध ठराव पारित केले आहे. सोबतच दारूविक्रत्यांवर पाळत ठेवण्यासाठी दारूबंदी युवा व महिला संघटना गठित करण्यात आली आहे.
नागेपल्ली येथे आयोजित ग्रामसभेत विस्तार अधिकारी मनोहर रामटेके, ग्रामसेवक वाळके, सरपंच लक्ष्मण कोडापे, ग्राम पंचायत सदस्य, मुक्तिपथच्या नंदिनी आशा, स्पार्क कार्यकर्ते नितीन पोटे, महेन्द्र उसेंडी यांच्यासह गावातील महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.
या ग्रामसभेत दारू विक्री बंद करणयाचा निर्णय घेण्यात आला. गावात जो कोणी दारू विक्री करणार त्याला 10 हजार रूपये दंड, विक्रेत्यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही, ग्रामपंचायत दाखले देणार नाही तसेच दारू पकडुन देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस असे ठराव पारित करण्यात आले. या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकिरता महिला गाव संघटना व युवा संघटना स्थापन करून अध्यक्ष सचिवांची निवड करण्यात आली. यावेळी दारूविक्रीमुळे गाव विकासावर होणारे परिणाम, व्यसन उपचार याबाबत मुक्तिपथचे नंदिनी आशा यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसभेत दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणुन शक्तिपथ संघटना व मुक्तीपथचे विस्तार अधिकारी मनोहर रामटेके यांनी कौतुक केले.



