ओबीसी वसतिगृहासाठी आंदोलन ; सरकारविरोधात घोषणाबाजी

चंद्रपूर : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करण्याच्या मागणीसाठी ओबीसी सेवा संघाच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी दि. ५ जुलै रोजी चंद्रपुरातील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातच मुक्काम आंदोलन केले.
राज्य सरकारने ३६ जिल्ह्यात ७२ वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या शैक्षणिक सत्रात वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. परंतु वसतिगृहात प्रवेशच दिला नाही. १ जुलैपासून महाविद्यालय सुरू झाले. परंतु सरकार, प्रशासनाच्या हालचालींना वेग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करून शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी वसतिगृह सुरु न झाल्याने गावाकडेच असून शैक्षणिक नुकसान होत आहे. मागच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरले होते त्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावे, कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी, एन.टी., एस.बी.सी., विद्यार्थ्यांना ओबीसी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे, ओबीसी, एन.टी., एस.बी.सी., विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करावी, वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळावे, आदींसह विविध मागण्या संघटनेने केल्या. आंदोलनात ओबीसी सेवा संघाचे जिल्हा महासचिव अॅड. विलास माथनकर, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, आकाश कडूकर, अतुल देऊळकर, अरुण मालेकर, भाविक येरगुडे, भास्कर सपाट आदी सहभागी झाले.
आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोन करून ओबीसी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. आमदार सुधाकर अडबाले यांनीही विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला व आंदोलकांशी फोनद्वारे संवाद साधला. दरम्यान, सहाय्यक आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी दिला.



