
एकात्ममानव दर्शन हिरक महोत्सवाचा समारोप ; निबंध, पुस्तक परीक्षण व रिल्स स्पर्धेचे बक्षीस वितरण
गडचिरोली : देश म्हणजे जमिनीचा भूभाग, जो नकाशात दिसतो. पण जेव्हा तेथील जनतेचे त्या देशाप्रती ममत्व जुळते, तेव्हा ते राष्ट्र होते. राष्ट्राचे एक मन असते, ज्याला पं. दीनदयाल उपाध्याय यांनी चिती म्हटले आहे. ती जागृत असावी लागते. एकात्म मानव दर्शन हे राष्ट्रबांधणीत अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विद्यालय शिक्षा गतीविधी प्रमुख तथा सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या प्राचार्य अरुंधती कावडकर यांनी केले.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाचा हिरक महोत्सव गोंडवाना विद्यापीठात विविध कार्यक्रम साजरा करण्यात आला. या महोत्सवाचा समारोप गुरूवार, 23 एप्रिल रोजी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पार पडला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तर प्रमुख वक्ता म्हणून अरुंधती कावडकर उपस्थित होत्या. तसेच मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सिनेट सदस्य तथा अध्यासनाचे प्रस्तावक संजय रामगिरवार, समन्वयक डॉ. अनिरुध्द गचके, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम प्रभृती उपस्थित होते.
कावडकर पुढे म्हणाल्या, पूर्वीच्या काळी गावात कुठलीही समस्या असली तर गावकरी गुरूजींकडे जात असत. आता मोठमोठी विद्यापीठे आहेत. त्यामुळे समाजातील प्रश्नांची उत्तरे विद्यापीठांकडे असली पाहिजे. त्याच द्दष्टीने विद्यापीठात संशोधन व्हायला हवे.
प्रास्तविक संजय रामगिरवार यांनी केले. येत्या काळात अध्यासन केंद्राच्या माध्यमातून एकात्ममानव दर्शनाबाबत एक सर्वंकक्ष संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निबंध स्पर्धेचे विजेते गणपती गजेला, साहिल झाडे, आदित्य गेडाम यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रूपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पुस्तक परीक्षण स्पर्धेत गणपती गजेला, विशा निकोडे व सुजित उंदिरवार यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रूपयांचे पुरस्कार व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पुरस्कारांची घोषणा डॉ. अनिरुध्द गचके यांनी केली. संचालन डॉ. सविता गोविंदवार यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रिया गेडाम यांनी केले. यावेळी सिनेट सदस्य धमेंद्र मुनघाटे, स्वरूप तारगे उपस्थित होते.
एकात्म मानव दर्शन अद्वैत सिध्दांताच्या जवळ जाणारा – डॉ. प्रशांत बोकारे
पं. दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन हा अद्वैत सिध्दांताच्या जवळ जाणारा आहे. देश व्हॉट्सअप, इंस्टाग्रामने चालत नाही, तर एकात्म मानव दर्शन सारख्या सिध्दांताने चालते. चुकीच्या विचारदर्शनामुळे विषमता निर्माण होते. देशात समता आणायची असेल तर एकात्म मानव दर्शन समजून घेतले पाहिजे, असे मत डॉ. प्रशांत बोकारे यांनी मांडले.



