गडचिरोलीविदर्भ

धानोरा–मुंगनेर पेंढरी मार्गाची दुरवस्था ; रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? नागरिकांचा संतप्त सवाल

​दोन वर्षांपासून दुरुस्तीची मागणी प्रलंबित; तातडीने काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा

​धानोरा : तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या धानोरा ते मुंगनेर पेंढरी मार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. या संपूर्ण रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे असून, हा रस्ता आहे की खड्ड्यांचा पट्टा? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

​मागील दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांचे कंबरडे मोडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्ता इतका खराब आहे की वाहन चालवणे कठीण झाले आहे.

​पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सायकल चालवताना कसरत होत आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेणे जिकिरीचे झाले आहे. शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

​”प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत आहे. कोट्यवधींचा निधी कुठे जातो?” असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपुरते दर्शन न देता या महत्त्वाच्या मार्गाची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी या मार्गाची किमान डागडुजी किंवा दुरुस्ती न केल्यास, परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button