
गोंदिया : राष्ट्रपिता महात्मा गांधींचे ‘कुष्ठरोगमुक्त भारत’ स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यांत १० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत “परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान” राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून कुष्ठरोगाची साखळी खंडित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोतुंला यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात निनदान न झालेले रुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली (MDT) आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव या तीन अतिदुर्गम तालुक्यांमधील ९३ गावांची निवड करण्यात आली आहे.
लक्ष्य: १ लाख ३३ हजार २७० लोकसंख्या. घरे: ३१ हजार ७२२ घरांचे सर्वेक्षण. पथके: आरोग्य विभागाची ९३ विशेष पथके घरोघरी जाऊन तपासणी आणि जनजागृती करणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र धनविजय यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेत संशयित रुग्णांची मोफत तपासणी, उपचार आणि समुपदेशन केले जाईल.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री गावंडे यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला कोणतीही लक्षणे न लपवता खरी माहिती द्यावी. वेळेवर निदान झाल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा (ज्या ठिकाणी घाम येत नाही). जाड, बधीर किंवा चकाकणारी त्वचा. कानाच्या पाळ्या जाड होणे किंवा भुवयांचे केस विरळ होणे. तळहात व तळपायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा. हातापायांत अशक्तपणा जाणवणे किंवा वस्तू हातातून निसटणे. त्वचेवर उष्णता किंवा थंडीची संवेदना न जाणवणे. यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधा. हे अभियान कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



