‘अगरबत्ती प्रकल्पा’च्या नावाखाली ४० महिलांची लाखो रुपयांची फसवणूक ; पिपरे दांपत्यावर गंभीर आरोप

न्याय न मिळाल्यास २३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा; राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई संथ असल्याचा संतप्त महिलांचा दावा
चामोर्शी : पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून गरिबांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून चामोर्शी येथील नगरसेवक आशिष अरुण पिपरे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांनी ४० हून अधिक महिला व पुरुषांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेकडून कर्ज मंजूर करून घेऊन त्या रकमेचा स्वतःसाठी वापर करणे आणि लाभार्थ्यांच्या माथी कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप करत, पीडित महिलांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी ‘एसआयटी’ (SIT) मार्फत चौकशी करून पिपरे दांपत्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करत, २३ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
महिलांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये आशिष पिपरे यांनी चामोर्शीतील गरीब शेतमजूर महिलांना अगरबत्ती प्रकल्प उभारून देण्याचे आमिष दाखवले. पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून देतो आणि ते कर्ज नंतर माफ करून देतो, असे खोटे आश्वासन दिले. बँकांशी संगनमत करून प्रत्येक लाभार्थ्याच्या नावे १.९० लाख ते २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. ही सर्व रक्कम पिपरे यांनी स्वतःच्या खात्यात वळती करून घेतली.

लाभार्थ्यांना मशिनरी देण्यासाठी पिपरे यांनी गुजरातवरून अतिशय स्वस्त (२५,५०० रुपये) दराची यंत्रे मागवली, मात्र कागदोपत्री त्यांची किंमत १ लाख रुपये दाखवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. स्वतःच्या जागेवर शेड उभारून प्रकल्प सुरू केला, पण अवघ्या सहा महिन्यात नफा होत नसल्याचे कारण सांगून तो बंद पाडला. जेव्हा महिलांनी आपल्या मशिनरी मागितल्या, तेव्हा “तुम्ही आर. एन. ट्रेडिंग कंपनीचे केवळ सदस्य आहात, मालक नाही,” असे म्हणत त्यांना हाकलून दिले.
बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी २.५० ते ३ लाख रुपयांच्या नोटिसा बजावल्याने महिला हवालदिल झाल्या आहेत. याप्रकरणी एप्रिल २०२५ मध्ये नागपूर येथील जनता दरबारात मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले, मात्र तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
“मला माजी खासदार, आमदार आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही,” अशा शब्दांत आशिष पिपरे महिलांना धमकावत असल्याचे पीडितांनी सांगितले. स्थानिक नेत्यांच्या दबावामुळेच चौकशी थांबली असून या भ्रष्टाचारात अनेक बडे चेहरे गुंतले असल्याचा संशय महिलांनी व्यक्त केला आहे.
याच उद्योगातील वंदना कोठारे यांच्याकडून ७.५० लाख रुपये घेऊन त्यांना जुन्या कर्जावरील ट्रॅक्टर खोट्या नोटरीद्वारे विकला. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीने तो ट्रॅक्टर जप्त केला, मात्र विचारणा केली असता पिपरे यांनी त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही दाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
घरातील भांडणे आणि बँकेच्या जप्तीचा धाक यामुळे अनेक महिला आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. या पिपरे दांपत्याची आणि त्यांच्या अमाप संपत्तीची चौकशी करून ८ दिवसांत अटक न झाल्यास २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा तसेच यादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही जीवितहानीला प्रशासन आणि संबंधित राजकीय नेते जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा चामोर्शीतील महिला व पुरुषांनी दिला आहे.



