गडचिरोलीविदर्भ

125 प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ

१२ व्या प्रशिक्षण सत्राचा समारोप : ‘जिद्द आणि मेहनतीने यशाचे शिखर गाठा’ – पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यांतील सुशिक्षित तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने अनोखा उपक्रम राबवला आहे. ‘पोलिस दादालोरा खिडकी’ अंतर्गत आयोजित १२ व्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सत्रात १२५ युवक-युवतींनी सहभाग घेतला. ४० दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणाचा समारोप १८ सप्टेंबर रोजी झाला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात उमेदवारांना पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन देण्यात आले. यात मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जनजागृती आणि नवीन कायद्यांचे ज्ञान यावर भर देण्यात आला. या प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना लोअर, टी-शर्ट, शूज आणि अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी आयोजित केलेल्या ११ सत्रांमध्ये एकूण २,३१८ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता, त्यापैकी २०५ जणांची शासनाच्या विविध विभागांमध्ये निवड झाली आहे. यासोबतच, ‘एक गाव एक वाचनालय’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ७२ वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 2021 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण 11,01,014 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रशिक्षणाथींना पुढील १०० दिवस जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने मेहनत घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “ही आगामी पोलीस भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. मैदानावरील मेहनतीसोबतच अभ्यासावरही लक्ष केंद्रित करा.” त्यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, सर्व पोलीस अंमलदार, अंतवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button