
भंडारा/गोंदिया : उपचारासाठी आलेल्या एका गरीब कुटुंबाच्या असहायतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीची २ लाख रुपयांत विक्री केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोंदियातील एक डॉक्टर असून, त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे ‘रॅकेट’ चालवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून डॉक्टरसह चार आरोपी सध्या फरार आहेत.
२ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील ‘चाइल्ड हेल्पलाईन’ला (१०९८) एक निनावी कॉल आला. भंडारा जिल्ह्यातील पांढरबोडी येथे एकटी राहणाऱ्या मालती वाघमारे या महिलेकडे १० दिवसांचे बाळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता मालतीने सुरुवातीला हे बाळ दत्तक घेतल्याचे सांगितले. मात्र, कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्यावर ती पसार झाली. पोलिसांनी पाठलाग करून तिला मोहाडी येथील कुशारी क्रॉसिंगवर पकडले, तेव्हा या मानवी तस्करीचा उलगडा झाला.
बाळाचे पालक गोंदियाचे असून त्यांना तीन अपत्ये आहेत. तिसरे बाळ अशक्त असल्याने ते उपचारासाठी गोंदियातील एका नामांकित डॉक्टरकडे गेले होते. “उपचाराचा खर्च जास्त आहे, आम्ही तुमच्या बाळाला नागपूरच्या एका सामाजिक संस्थेत पाठवतो,” असे सांगून डॉक्टरने पालकांची दिशाभूल केली. प्रत्यक्षात, डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी पालकांच्या खात्यात काही रक्कम जमा करून बाळाची विक्री भंडारा येथील महिलेला केली. लालेश्वरी नंदकिशोर सदेपाच (वय ३९, रा. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुख्य सूत्रधार डॉक्टर (नाव गोपनीय), मालती प्रकाश वाघमारे (खरेदीदार), पूर्णिमा सतीश धुर्वे आणि उमेशसिंग गेहलोत. हे चौघे फरार आहेत.
वरठी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८०, ८१, १४३(४) आणि १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ एकच प्रकार नसून हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना हेरून त्यांची मुले विकणारी आंतरराज्यीय टोळी यात सक्रिय असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्य सूत्रधार असलेल्या डॉक्टरच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या अटकेनंतर या रॅकेटमध्ये आणखी किती मुलांची विक्री झाली आणि यात कोणाचे हितसंबंध आहेत, याचे मोठे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.



