चंद्रपूरविदर्भ

धान/भरडधान्य, सोयाबीन, मुगच्या खरेदीसाठी मुदतवाढ ; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आले आहेत. त्यांच्या आणखी एका प्रयत्नाला राज्यव्यापी यश आलं आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना सरकारने काही तासांतच प्रतिसाद दिला आणि धान/भरडधान्य तसेच सोयाबीन, मुग व उडिदच्या खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने खरीप पणन हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरीता दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिली होती. मात्र नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यामुळे शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे मुदतवाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. आ. मुनगंटीवार यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्राद्वारे कळविले आणि त्याचवेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चाही केली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संपर्क साधून शेतकऱ्यांची समस्या लक्षात आणून दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सरकारने आदेश काढत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीकरिता १५ जानेवारी २०२५ पर्यंत मूदत वाढवून दिली. ‘खरीप पणन हंगाम २०२४-२०२५ मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला दि. १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे’, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

यासोबतच हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन, मुग व उडिद खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांची ऑनलाईन प्रक्रिया देखील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करायची होती. आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने ६ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी मानले आभार

कायम शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याची प्रचिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button