
पुण्याहून मुलीचा प्रवेश निश्चित करून परतताना घडला अपघात; अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कार बनली ‘मृत्यूचा सापळा’
वर्धा: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची मालिका सुरूच असून, रविवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. वर्धाजवळील वेरूळ आकाजी परिसरात भरधाव कार आणि आयशर ट्रकमध्ये झालेल्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीच्या ज्वाळांमध्ये वेढल्या गेल्याने कारमधील वर्ध्याच्या एकाच कुटुंबातील चार जणांसह ट्रक चालक व क्लिनर, अशा एकूण सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील रहिवासी असलेले तिपळे कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात सोडून आनंदाने कारने मूळ गावी परतत होते. रविवारी रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास त्यांची कार वर्ध्याजवळील वेरूळ आकाजी परिसरात पोहोचली असता, मागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर काही सेकंदांतच दोन्ही वाहनांना भीषण आग लागली.
धडक बसताच कारचे दरवाजे ऑटोमॅटिक लॉक झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. क्षणात पेट घेतलेल्या कारमध्येच तिपळे कुटुंबाचे चार सदस्य जिवंत जळून खाक झाले. तर आगीचा भडका इतका वेगाने पसरला की ट्रकमधील चालक आणि क्लिनरलाही बाहेर पडता आले नाही आणि त्यांचाही होरपळून दुर्दैवी अंत झाला.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी हायवे सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने आणि त्यातील सहाही जण पूर्णपणे जळून खाक झाले होते. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी इतर मार्गाने वळवण्यात आली होती. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात तीव्र शोककळा पसरली असून, समृद्धी महामार्गावरील अनियंत्रित वेग आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.



