
चामोर्शी न्यायालयाचे आदेश ; वनविभागाची कारवाई
चामोर्शी : वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै अंतर्गत येणाऱ्या गिलगाव जंगल परिसरात जिवंत विद्युत प्रवाह सोडून नीलगाय या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी कुनघाडा रै वनपरिक्षेत्राने ३१ जानेवारी रोजी १२ आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांची रवानगी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीत झाली.
वन विभागाने कारवाई केल्यानंतर आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनकोठडीची मुदत सपल्याने १२ आरोपींना चामोर्शी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये अजय परशुराम मंटकवार, नीलेश शालीक तुनकलवार, काशिनाथ मंगरू वडेंगकवार, भूषण अशोक तुनकलवार, प्रकाश मंगरू मंटकवार, गणेश शालीक तुनकलवार, शत्रुघ्न मंगरू मंटकवार, नितीन कारू आतला, किसन वसंत सिडाम, महेश कालिदास तुनकलवार, श्रीकृष्ण बारीकराव, चांगदेव दशरथ मुसद्दीवार यांचा समावेश आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एम. ए. तावाडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक आर. पी. धाईत, क्षेत्र सहायक एस. एस. खोब्रागडे व कर्मचाऱ्यांनी केली. एक आरोपी अद्याप फरार आहे.



