गडचिरोलीविदर्भ

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात भाकपाचे ‘ताला ठोको’ आंदोलन ; गावकऱ्यांचा संताप अनावर

अपुऱ्या मनुष्यबळापासून ते अनियमित वीजपुरवठ्यापर्यंतच्या समस्यांचा भडीमार ; प्रशासनाला गंभीर इशारा

एटापल्ली : तालुक्यातील नागरिकांनी महावितरणच्या मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरुद्ध अखेर लढा पुकारला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भा.क.पा.) नेतृत्वाखाली जांबिया गट्टा येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रावर “ताला ठोको” आंदोलन छेडत संतप्त गावकऱ्यांनी शासन व व्यवस्थेला सुधारणा करण्याचा इशारा दिला. या आंदोलनाने आपली सहनशक्तीचा बांध फुटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महावितरणसारख्या सार्वजनिक उपक्रमाच्या कार्यपद्धतीत आज खाजगीकरणाचे सावट स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नफ्याच्या हव्यासाने लोकसेवेला बाजूला सारणाऱ्या शासकीय धोरणांचे थेट परिणाम आता ग्रामीण भागात दिसू लागले आहेत. यंत्रणा फक्त शहरी आणि भांडवली केंद्रांच्या सेवेसाठी झुकत असून, आदिवासी व शेतीप्रधान ग्रामीण भाग उपेक्षितच राहत आहेत.

एटापल्ली तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून अंधारात जगत आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, लाईन दुरुस्ती वेळेत होत नाही, कर्मचारी अनुपस्थित असतात, आणि स्थानिक तक्रारी पूर्णतः दुर्लक्षित केल्या जात आहेत. हे केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून, ही भांडवलशाहीच्या हितसंबंधांना झुकणाऱ्या शासकीय धोरणांची फळं असल्याचे भा.क.पा.ने म्हटले आहे.

या सगळ्या परिस्थितीविरोधात आवाज बुलंद करत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भा.क.पा.) अहेरी विधानसभा क्षेत्राच्या नेतृत्वाखाली २ जून रोजी सकाळी ११ वाजता जांबिया गट्टा येथील ११/३३ के.व्ही. उपकेंद्रावर “ताला ठोको” आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन म्हणजे नागरिकांच्या थांबलेल्या संयमाचा उद्रेक होता. उपस्थित नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी “जनतेला अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेवर ताला ठोका!” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

गट्टा उपकेंद्रावर तीन नवीन वायरमन तात्काळ नियुक्त करावेत. सध्याचे कामचुकार वायरमन आणि अनुपस्थित ऑपरेटरवर कार्यवाही व्हावी. उपस्थित नसलेल्या चार ऑपरेटरपैकी केवळ एकच कार्यरत असल्याने, यावर शिस्तभंगाची कार्यवाही आवश्यक आहे. मुरेवाडा, नैताला, कॉईनवर्षी, हाचबोडी आणि रेकलमेट्टा या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही – ही अन्यायाची परिसीमा आहे. तीन फिडरवर ६० गावांचा भार असल्याने अधिक तीन फिडर आणि वायरमन पुरवावेत. गट्टा क्षेत्रासाठी स्वतंत्र वितरण केंद्र स्थापन करावे. ऑपरेटर आणि वायरमन यांना गट्टा मुख्यालयात वास्तव्यास बांधील करावे. झाडांची मान्सूनपूर्व छाटणी न झाल्याने धोका वाढतोय – तातडीने कारवाई व्हावी. बाजारातील विद्युत तारांच्या धोकादायक स्थितीवर उपाययोजना करावी. सुरजागड स्टेशनवर वीज खंडित झाल्यावर पुनःपुरवठा उशिरा होतो – एक जबाबदार कर्मचारी नेमावा. गुडुंजूर गावातील नागरिकांनी स्वतः पोल लावले, त्या खर्चाची भरपाई द्यावी. या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.

या आंदोलनात प्रमुख नेतृत्व कॉ. सचिन मोतकुरवार (अध्यक्ष, भा.क.पा. अहेरी विधानसभा), सैनू गोटा (माजी जि.प. सदस्य), कॉ. सूरज जककुलवार (जिल्हा कौन्सिल सदस्य, भाकपा) तसेच कॉ. रामदास उसेंडी, कॉ. विष्णु हिचामी, कॉ. रवी अलोन, अनेक भा.क.पा. कार्यकर्ते, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी झालेल्या भाषणात कॉ. सचिन मोतकुरवार यांनी जोरदार शब्दांत प्रशासन आणि महावितरणला धारेवर धरले. “ही व्यवस्था सामान्य जनतेच्या सेवेपेक्षा भांडवलदारांच्या मक्तेदारीकडे वळली आहे. ही कंपनीच्या नावाखाली चालणारी लूट बंद झालीच पाहिजे,” असे ठाम मत त्यांनी मांडले.

भा.क.पा.ने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वरील मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर पुढील काळात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. “ही केवळ सुरुवात आहे – लढा अंधाराविरुद्ध आहे, लढा अन्यायाविरुद्ध आहे, लढा भांडवलशाहीच्या नाकावर टिच्चून उभा राहिलेल्या जनतेचा आहे,” असा हुंकार कार्यकर्त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button