गोंदियाविदर्भ

नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी अचुक आकडेवारी महत्वाची – उपायुक्त सुनिल धोंगडे

राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

गोंदिया : योग्य नियोजन, प्रभावी निर्णय आणि नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी अचुक आकडेवारी महत्वाची असते, असे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सुनिल धोंगडे यांनी केले.

येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सोमवारी 20 वा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.रुपेश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, एनएमडी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अलका पाटील उपस्थित होत्या.

उपायुक्त धोंगडे म्हणाले, भारतीय सांख्यिकी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि सांख्यिकीचे जनक प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 जून रोजी ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा केला जातो. राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सांख्यिकी विज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच देशाच्या विकासासाठी अचूक माहिती, आकडेवारी आणि डेटा यांचे महत्व अधोरेखित करणे हा आहे. देशाच्या विकासासाठी अचुक डेटा, वैज्ञानिक विश्लेषण आणि प्रभावी नियोजन आवश्यक आहे. राष्ट्राच्या उभारणीत सांख्यिकीय आकडेवारीचे खुप महत्व आहे, असे त्यांनी सांगितले.

प्राध्यापिका डॉ.पाटील म्हणाल्या, देशातील 140 कोटी जनतेला मोजणे म्हणजे सोपे काम नाही. अचुक माहिती गोळा करुन ती शासनाकडे पाठविली जाते, असे उदाहरण देऊन त्यांनी समजावून सांगितले. प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी भारतातील आधुनिक सांख्यिकी व्यवस्थेच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या संशोधनामुळे आणि कार्यामुळे देशात डेटा संकलन, विश्लेषण आणि नियोजन प्रक्रियेला वैज्ञानिक आधार मिळाला. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या धोरणांची आखणी करताना सांख्यिकीचा प्रभावी वापर करण्याची दिशा त्यांनी दाखवून दिली. शासन, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये घेतले जाणारे अनेक महत्वाचे निर्णय विश्वासार्ह आकडेवारीवर आधारित असतात, असे त्या म्हणाल्या.

डॉ. राऊत म्हणाले, आकडेवारी ही केवळ संख्या नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. योग्य आकडेवारीमुळे नियोजन, धोरणनिर्मिती आणि प्रगतीचा मार्ग सुकर होतो. सांख्यिकी हे संशोधन, अर्थव्यवस्था, शासन आणि समाजासाठी एक प्रभावी साधन आहे. अचुक माहिती, अचुक विश्लेषण आणि अचुक निर्णय हेच प्रगतीचे मार्ग आहे. सांख्यिकी दिन हा अचुक माहिती आणि आकडेवारीच्या आधारे अधिक सक्षम आणि प्रगत भारत घडविण्याचा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.

निमसरकर म्हणाल्या, दैनंदिन जीवनात सांख्यिकी आकडेवारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या डिजिटल युगात डेटा हा विकासाचा महत्वाचा पाया मानला जातो. लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यासारख्या विविध क्षेत्रातील माहितीचे विश्लेषण करुन शासन आणि धोरणकर्ते अधिक प्रभावी निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमास सहायक संशोधन अधिकारी तुलसीदास झंझाड व कमलाकर गावनेर, सांख्यिकी सहायक उत्तम साकोरे, राहूल राऊत, कृपाली राऊत, देवेंद्र डोरलीकर, गौतम शहारे, तसेच विपुल फरतडे, प्रशांत प्रेमलवार, मुकेश सोरले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र डोरलीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कमलाकर गावनेर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button