
एक आरोपी गजाआड, दोन विधी संघर्षग्रस्त बालके ताब्यात; कोणतीही सुगावा नसताना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लावला शोध
गडचिरोली : येथील रामनगर भागातील ‘माऊली मोबाईल शॉप’चे कुलूप तोडून झालेल्या धाडसी चोरीचा गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत शिताफीने छडा लावला आहे. कोणतीही सुगावा किंवा पुरावा घटनास्थळावर नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरी गेलेल्या मुद्देमालासह तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण ११ महागडे मोबाईल हँडसेट व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामनगर (वार्ड क्र. ११) येथील रहिवासी आणि व्यावसायिक अनिरुद्ध दिकोंडवार हे २४ मे २०२६ रोजी रात्री ९:०० वाजता आपले ‘माऊली मोबाईल शॉप’ नेहमीप्रमाणे कुलूप लावून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी दुकानातील विविध कंपन्यांचे ९ मोबाईल हँडसेट, मोबाईल ॲक्सेसरीज आणि रोख २,५०० रुपये असा एकूण ९८,६९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेप्रकरणी २६ मे २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ०६५७/२०२६, कलम ३०५ (ए), ३३१ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
घटनास्थळावर चोरांनी कोणताही पुरावा न सोडल्यामुळे या गुन्ह्याचा शोध घेणे गडचिरोली पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचे अचूक विश्लेषण करून संशयितांची कोंडी केली. अखेर पोलिसांनी मुरमाडी (ता. धानोरा, जि. गडचिरोली) येथील रहिवासी असलेला मुख्य आरोपी रोहन व्यंकट दरो (वय २२ वर्षे) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी सखोल आणि कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून मूळ गुन्ह्यातील मुद्देमालाव्यतिरिक्त चोरीचे एकूण १० मोबाईल फोन (अंदाजे किंमत १ लाख रुपये) आणि ५० हजार रुपये किमतीचा १ महागडा आयफोन असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मुख्य आरोपी रोहन दरो याला रंगेहात अटक करण्यात आली असून, दोन्ही विधी संघर्षित बालकांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी करीत आहेत.
गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि. धनराज कोळी, पोउपनि. शिवाजी देशमुख, पोलीस अंमलदार गोविंद केकाण आणि राजू कांबळे यांनी ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल व्यावसायिक वर्तुळातून कौतुक होत आहे.



