क्राईमगोंदियाविदर्भ

आदर्श पतसंस्थेत २३ लाखांचा अपहार ; कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

​सालेकसा : तालुक्यातील ‘आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थे’मध्ये तब्बल २३ लाख ६५ हजार ९७० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या सभासदांची फसवणूक करणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश रामप्रसाद खोब्रागडे (५४, रा. भजेपार, सालेकसा) हा सदर पतसंस्थेत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने सन २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांच्या कालावधीत संस्थेच्या दस्तऐवजांमध्ये आणि ताळेबंदात (Balance Sheet) खोट्या नोंदी करून मोठ्या प्रमाणावर अफरातफर केली.

​नित्य निधीत फेरफार: गौतम धनराज शहारे, पूनम राधेश्याम नेवारे, संजय अंवा उके आणि नरेंद्र धामाडे या सभासदांच्या नित्य निधी रकमांमध्ये परस्पर गैरव्यवहार करण्यात आला. ​गुंतवणुकीचा बनाव: बचत फंड आणि इमारत निधीची प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक न करता, ताळेबंदात मात्र ती गुंतवणूक केल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केली. ​लेखापरीक्षकांची दिशाभूल: लेखापरीक्षण (Audit) दरम्यान खोटी माहिती देऊन आणि दस्तऐवज सादर करून तपासणी अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करण्यात आली.

​​कृष्णकुमार हेमराज गहगये (४२, रा. आमगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौकशीअंती समोर आले की, आरोपीने गेल्या पाच वर्षांत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने २३ लाख ६५ हजार ९७० रुपयांची अफरातफर केली. हा सर्व पैसा संस्थेच्या सामान्य सभासदांचा होता, ज्यांची मोठी फसवणूक झाली आहे.

​​याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी आरोपी जगदीश खोब्रागडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, कलम ४०६, कलम ४०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ​या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक पोठरे यांच्या नेतृत्वात कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. लवकरच यातील अन्य धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

सामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई पतसंस्थेत जमा केली होती. मात्र, जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे डल्ला मारल्यामुळे सभासदांमध्ये संतापाचे वातावरण असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button