
मोहाडी : तालुक्यातील रोहा येथील एका धान्य व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाख ५२ हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केल्याची धक्कादायक घटना १५ मे रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या सुमारास मोहाडी शहरात भरवस्तीत घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मारोती आगासे (वय ५०, रा. रोहा) हे धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याचे पैसे देण्यासाठी त्यांनी तुमसर येथील अॅक्सिस बँक शाखेतून ३ लाख ५ हजार रुपये काढले होते. त्यांच्याकडे आधीचे ४७ हजार रुपये रोख स्वरूपात होते, अशी एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या (क्र. MH 36-A 7860) डिक्कीत ठेवली होती.
रक्कमेसोबतच डिक्कीमध्ये अॅक्सिस बँक व बीडीसीसी बँक (मोहाडी शाखा) यांची चेकबुक्स. शेतीशी संबंधित सातबारा व अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती. बँकेतून रक्कम काढून आल्यानंतर आगासे हे मोहाडी येथील एका लस्सी सेंटरजवळ पाणी पिण्यासाठी थांबले. त्यांनी आपली दुचाकी बाहेर उभी केली होती. अवघ्या काही मिनिटांच्या या अवधीत, दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची डिक्की शिताफीने फोडली आणि त्यातील रोकडसह सर्व कागदपत्रे घेऊन पोबारा केला.
काही वेळातच चोरी झाल्याचे लक्षात येताच आगासे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
”भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.” याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठी रक्कम सोबत नेताना सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.



