
गोंदिया : नाल्याला आलेल्या पुरात मासे पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा तोल गेल्याने पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथे घडली. विजय नाईक (38, रा. पिंडकेपार) असे मृताचे नाव आहे.
गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातही देवरी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तालुक्यातील अनेक छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, पहिल्या पावसाच्या पाण्यातून मासे बाहेर येत असल्यामुळे मासे पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता भरपुरात मासेमारी करताना नागरिक दिसून येत आहे. देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील विजय नाईक हा गावालगत असलेल्या पिंडकेपार गोटाबोडी या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास त्याचा तोल गेल्याने तो पाण्यासोबत वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास पोलिस हवालदार बोपचे करीत आहे.



