क्राईमगडचिरोलीविदर्भ

दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या

किरकोळ भांडणाचे पर्यावसन हत्येत; ‘लगाम चेक’ येथील हृदयद्रावक घटना, आरोपी मुलाला अटक

मुलचेरा : कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडविणारी घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका पोटच्या ४० वर्षीय मुलाने आपल्या ६१ वर्षांच्या वयोवृद्ध वडिलांवर लाकडी बल्लीने (दांड्याने) डोक्यावर आणि चेहऱ्यावर जबर प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण मुलचेरा आणि अहेरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. नारायण आशा टेकाम (वय ६१ वर्षे, व्यवसाय- मजुरी) असे मृत वडिलांचे नाव असून, विजय नारायण टेकाम (वय ४० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नारायण टेकाम हे आपल्या कुटुंबासह लगाम चेक येथे राहत होते. ४ जूनच्या रात्री १०:०० ते ११:५० वाजताच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा आरोपी विजय टेकाम हा अतिप्रमाणात दारू पिऊन घरी आला. घरामध्ये आल्यानंतर त्याने किरकोळ कारणावरून आपले वडील नारायण यांच्याशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी विजयने रागाच्या भरात आणि नशेत शुद्ध हरपल्याने घरात असलेली लाकडी बल्ली हाती घेतली. त्याने वृद्ध वडिलांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर एकापाठोपाठ एक जीवघेणे जबर प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने नारायण टेकाम यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला.

या संदर्भात मृतकाचे सख्खे भाऊ म्हणजेच आरोपीचे काका तुळशीराम आशा टेकाम (वय ६५ वर्षे, रा. लगाम चेक) यांनी ५ जून रोजी थेट अहेरी पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून अहेरी पोलिसांनी तात्काळ पावले उचलत पाषाणहृदयी आरोपी विजय नारायण टेकाम याच्याविरुद्ध अप. क्र. ०१६६/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ (हत्येचा गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळ हे अहेरी पोलीस ठाण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेला अतिशय दुर्गम भागात आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्रीच घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी आरोपी विजय टेकाम याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या कौटुंबिक हत्याकांडाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वात अहेरी पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button