गडचिरोलीविदर्भ

टेकला गावात उभारला दारूबंदीचा विजयस्तंभ : ग्रामस्थांचा पुढाकार

गडचिरोली : दुर्गम भागातील गावे आता विकासासोबतच वैचारिक क्रांतीकडे वळत असल्याचे जिवंत उदाहरण भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायत टेकला येथे पाहायला मिळाले. वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त गावकरी, ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मार्चला गावात क्रांतीसूर्य वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा थाटात पार पडला. त्यानिमित्ताने गावात दारूबंदीच्या विजयस्तंभाची देखील स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांपासून हे गाव अवैध दारूविक्री मुक्त असून, आता ‘आदर्श गाव’ म्हणून नावारूपास येत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच काजल धुर्वा, उपसरपंच बुकलुजी लेकामी, ग्रा.पं. अधिकारी वंगाजी वेलादी, मधुकर दुर्वा, किशोर दुर्वा, संजय भोगासी, सगुना दुर्वा, मंगला दुर्वा, ज्योत्स्ना दुर्वा, शीतल पुंगाठी, शिक्षक मधुकर डोमलवार, शंकर दुर्वा, जया वाचामी, सैनु दुर्वा, पांडू बोगामी आणि मुक्तीपथचे तालुका संघटक निळा किन्नाके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यानिमित गावातील महिलांनी श्रमदानातून संपूर्ण गावाची ग्रामस्वच्छता करून गावाला एक सुंदर रूप दिले होते. या स्तंभाची उभारणी ग्रामपंचायत टेकला व लोक सहभागातून करण्यात आली. गावाची स्वच्छता आणि शिस्त पाहून उपस्थित पाहुण्यांनी ग्रामस्थांचे तोंडभरून कौतुक केले. टेकला गावाने गेल्या दशकापासून दारूविक्री बंद ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. मुक्तीपथ अभियानाच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामविकास अधिकारी व्ही.पी. वेलादी यांच्या प्रयत्नांतून हे गाव आता प्लास्टिकमुक्त गाव, व्यसनमुक्त शासकीय कार्यालय, तंबाखूमुक्त शाळा अशा विविध स्तरांवर यशस्वी झाले आहे. कार्यक्रमानंतर हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी संपूर्ण गावाचे निरीक्षण केले. गावची एकजूट आणि व्यसनमुक्तीची जिद्द पाहून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. टेकला गावाची ओळख आता केवळ एक गाव म्हणून न राहता, एक सुसंस्कृत आणि व्यसनमुक्त ‘आदर्श गाव’ म्हणून निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button