
देशात अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ; राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची महिलांना ‘आरोग्याची गोड भेट‘
गडचिरोली : महिलांच्या आरोग्याप्रती संवेदनशीलता जपत आणि रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात उद्भवणाऱ्या समस्यांकडे विशेष लक्ष देण्यासाठी राज्य सरकारतर्फे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून, गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात या सुविधेचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर सुरू झालेला हा उपक्रम महिलांसाठी मोठी भेट ठरला आहे. मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या काळात होणारे हार्मोनल बदल, शारीरिक त्रास, मानसिक ताण आणि हाडांच्या समस्यांकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हेच ओळखून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हे विशेष क्लिनिक सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रजोनिवृत्ती पश्चात (मेनोपॉज) क्लिनिकचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेविका तथा आरोग्य सभापती वर्षाताई शेडमाके यांच्या हस्ते पार पडले. या क्लिनिकमध्ये दर बुधवारी बाह्यरुग्ण विभागात (OPD) तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार. हृदय, हाडे आणि हार्मोन तपासणी. मानसिक आरोग्य समुपदेशन. जीवनशैलीविषयक मार्गदर्शन. इत्यादी सुविधा उपलब्ध असतील.
सदर कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आरोग्य प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
“मेनोपॉज हा आजार नाही, तर नैसर्गिक टप्पा आहे. या काळात महिलांना सन्मान, योग्य सल्ला आणि उपचार मिळावा, यासाठीच हे क्लिनिक सुरू केले आहेत. महिलांचे आरोग्य मजबूत झाले, तर समाज सक्षम होईल.”
— मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री
“हार्मोनल बदलांमुळे होणारी मानसिक अस्वस्थता आणि शारीरिक त्रासाकडे समग्र दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम केले जाईल.”
— डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली



