गडचिरोलीविदर्भ

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’! ६ पथके दाखल; ९३६ घरांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्वतः केली पाहणी ; डेंग्यू व हिवताप चाचण्या निगेटिव्ह, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटनेनंतर जिल्हा आरोग्य विभाग अत्यंत सतर्क झाला असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्वतः बाधित क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून, ६ आरोग्य पथके सध्या गावात तळ ठोकून आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. प्रताप शिंदे यांनी लखमापूर बोरी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करून वैद्यकीय सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी नागपूरच्या सहायक संचालक (हिवताप) डॉ. नयना धूपारे, डॉ. माधव शिंदे, डॉ. सुजिता वाडीवे आणि डॉ. रुपेश पेंदाम या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तांत्रिक मार्गदर्शन केले.

मुख्य प्रतिबंधात्मक उपाययोजना : १. जलद तापरुग्ण सर्वेक्षण (Rapid Fever Survey): गावातील ९३६ घरांना भेटी देऊन आतापर्यंत ६८५ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. २. रक्त व पाणी नमुने तपासणी: तापाच्या रुग्णांचे २९ रक्तनमुने घेण्यात आले असून प्राथमिक तपासणीत डेंग्यू व हिवताप निगेटिव्ह आले आहेत. गावातील पाण्याचे २० नमुने सखोल तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ३. कीटकजन्य आजार नियंत्रण: १६०१ पाण्याचे साठे (कंटेनर) तपासण्यात आले असून १६० साठ्यांमध्ये टेमिफॉसचा वापर करण्यात आला. तसेच ८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. ४. समुपदेशन व अफवांना लगाम: आरोग्य पथकाद्वारे पालकांमधील भीती दूर करण्यासाठी गृहभेटी देऊन आरोग्य शिक्षण दिले जात आहे. ५. २४ तास संनियंत्रण: बाधित क्षेत्रात वैद्यकीय कर्मचारी तैनात असून जिल्हा स्तरावरून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

आरोग्य विभागातर्फे केवळ औषधोपचारच नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. बदलत्या हवामानामुळे होणारे आजार, डासांपासून होणारा प्रसार रोखण्यासाठी पाण्याची भांडी कोरडी करणे आणि परिसराची स्वच्छता राखण्याबाबत ग्रामस्थांशी वैयक्तिक स्तरावर संवाद साधण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आरोग्य विभाग सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी आणि ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button