
सिरोंचा तालुक्यातील सुरायपल्ली येथील धक्कादायक घटना ; आरोपी मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
सिरोंचा : सततची दारूबाजी आणि घरात होणाऱ्या दररोजच्या कटकटीला कंटाळून पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना सुरायपल्ली (आदीमुत्तापुर) येथे घडली आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण सिरोंचा तालुक्यात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत मोंडी मल्लय्या अक्कूदारी (४५, रा. आदीमुत्तापुर) हे मजुरीचे काम करायचे. मात्र, त्यांना दारूचे व्यसन होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोंडी मल्लय्या हे दररोज दारू पिऊन घरी येत असत आणि क्षुल्लक कारणावरून घरात भांडण-तंटा करत असत. वडिलांच्या या वागण्यामुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे मुलगा सनमुखराव मोंडी अक्कूदारी (३०) हा प्रचंड तणावात आणि रागात होता. नेहमीप्रमाणे वडिलांनी घरात वाद घालण्यास सुरुवात केली असता, सनमुखरावचा संयम सुटला. संतापाच्या भरात त्याने वडिलांच्या कपाळावर आणि डोळ्याच्या डाव्या बाजूला कशाच्या तरी सहाय्याने गंभीर वार केला. इतक्यावरच न थांबता त्याने वडिलांचे डोके लाकडी बाजेवर जोरात आदळले. या भीषण हल्ल्यात मोंडी मल्लय्या हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा सनमुखराव याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत गुन्हा क्रमांक ०९/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दारूच्या व्यसनामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सुरायपल्ली परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याने गावात तीव्र दुःख व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.



