
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने सदस्यसंख्येच्या विक्रमाद्वारे जगातील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. पक्षाची सदस्य संख्या वाढवण्यासाठी सध्या विशेष नोंदणी मोहीम राबवली जात असून, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत २८,००० हून अधिक सदस्यांची नोंदणी झाली आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी शासकीय विश्रामगृह, काँम्पलेस गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भाजपने सदस्य नोंदणी मोहीम १५ जानेवारीपर्यंत आयोजित केली होती, परंतु ती आता २५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. २०१४ साली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या मोहिमेद्वारे पक्षाने ११ कोटी ५० लाख सदस्यांची नोंदणी केली होती, ज्यामुळे भाजपने चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकत जगातील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.
सध्या राज्यात एक कोटी सदस्य नोंदवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदवले जातील, त्यापैकी ५ सक्रिय सदस्य असतील. सामान्य सदस्यांसाठी कोणतेही शुल्क नाही, तर सक्रिय सदस्य होण्यासाठी १०० रुपयांचे नाममात्र शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या सक्रिय सदस्यांना नक्कीच याचा फायदा मिळणार आहे.
माजी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की, भाजपच्या सत्ताकाळात संविधानाच्या कोणत्याही कलमाला धक्का लागलेला नाही. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संविधानाचा आदर राखला गेला आहे. उलट काँग्रेसने आपल्या कार्यकाळात संविधानाचा वारंवार अपमान केला. १९७५ साली आणीबाणी लावून संविधानाचा अवमान केला गेला, तर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९५२ मध्ये मुबंई प्रांतातून उतर मुबंई मतदान संघातुन शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने निवडणुक लढविली व सन १९५४ साठी भंडारा येथील लोकसभा पोटनिवडणुक लढविली या दोन्ही निवडणुकीत पराभूत करण्याचे पाप काँग्रेसने केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू केली. याशिवाय, ११ ते २६ जानेवारी दरम्यान संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर जनजाती गौरव दिवस साजरा केला जाणार आहे. आदिवासींच्या योगदानाचा सन्मान म्हणून स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या ७५ वीर आदिवासींच्या स्मारकांची उभारणी केली जाणार असल्याचे नेते यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, लोकसभा समन्व्यक प्रमोद पिपरे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. उमेश वालदे, उपाध्यक्ष अरुणजी हरडे, संजयजी बारापात्रे, जनार्दन साखरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या सदस्य नोंदणी, संविधान सन्मान आणि भगवान बिरसा मुंडा जयंतीसारख्या मोहिमा पक्षाला बळकट करणार आहेत. या उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांना सक्रिय करून, संविधानाचा आदर आणि आदिवासी गौरव वृद्धिंगत करण्याचे भाजपचे प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत.



