
चांदपूर आश्रमशाळेतील प्रकार
भंडारा : आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने रात्रीला रक्ताची उलटी केली. यात विद्यार्थिनीला प्राथमिक उपचारानंतर चक्क बसमधून पुढील उपचाराकरिता नेण्यात आले. तिचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. राजश्री मदन वाढीवे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. हा प्रकार तुमसर तालुक्याच्या चांदपूर येथील आडकू चौधरी या अनुदानित आश्रमशाळेत घडला. या घटनेनंतर आदिवासी संघटनांनी संताप व्यक्त करत मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
तुमसर तालुक्यातील चांदपूर येथे आडकू चौधरी आश्रमशाळा आहे. राजश्री वाढीवे ही आडकुजी चौधरी अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेतच मुक्काम असतो. राजश्रीची प्रकृती चार ते पाच दिवसांपासून बरी नव्हती. याबाबत तिने शाळा प्रशासनाला माहिती दिली. प्रकृती अधिक खालावल्याने तिला शाळेतील शिक्षकांनी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातून तुमसर येथे रेफर केले. तुमसर येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. भंडारा येथे उपचाराकरिता राज्यश्रीला चक्क बसमधून नेण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे राजश्रीचा मृत्यू झाला. तुमसर येथे दुपारी ४ वाजता उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
राजश्रीचे वडील व आईने, माझ्या मुलीकडे आश्रमशाळेत दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप केला. आदिवासी संघटनेचे अशोक उईके यांनी विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. शाळेच्या व्यवस्थापनाकडून चूक झाल्याचा आरोप त्यांनी केला असून दहा लाखांचा मोबदला देण्यात यावा तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
राजश्रीच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळा व्यवस्थापनाने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संस्थेचे कार्यकारी सचिव खुमान चौधरी यांनी बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता राजश्रीचे वडील मदन वाढीचे यांना दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच उरलेली आठ लाख रुपयांची रक्कम १५ दिवसांत देण्याचे लिखित आश्वासन दिले.



