गडचिरोलीविदर्भ

मातृशक्ती योग कक्षातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचा सत्कार

गडचिरोली : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मातृशक्ती योग कक्षाच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित महिलांनी यावेळी स्त्री शिक्षण, समानता आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प केला.

नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रणोती निंबोरकर यांचा मातृशक्ती योग कक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी त्यांचे योगदान जिल्ह्यासाठी उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी पदाधिकाऱ्यांनी काढले.

आपल्या मनोगतात नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत महिलांच्या शिक्षणाची जी चळवळ सुरू केली, ती आजही समाजासाठी दीपस्तंभ आहे. आधुनिक युगात महिलांनी केवळ सुशिक्षित न होता आत्मनिर्भर बनून सक्षम समाजनिर्मितीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे.”

या सोहळ्याला मातृशक्ती योग कक्षाच्या पदाधिकारी, मोठ्या संख्येने महिला भगिनी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा देणारा हा सोहळा महिलांमध्ये नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button