गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात उद्यापासून ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियाना’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. सिकलसेल मुक्त जिल्ह्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल असून, जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हावासियांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सिकलसेल ॲनिमिया हा एक गंभीर अनुवांशिक रक्ताचा विकार आहे. यावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने प्रशासनाने १५ जानेवारीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील ० ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल.संशयित व्यक्तींच्या रक्ताची प्राथमिक चाचणी केली जाईल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास सखोल चाचण्या करून संबंधित व्यक्तीला विशेष ओळख कार्ड दिले जाईल. सिकलसेलवर प्रभावी ठरणारे ‘हायड्रॉक्सी युरिया’ (Hydroxyurea) हे औषध प्रशासनामार्फत रुग्णांना पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.

सिकलसेल नियंत्रणाबाबत बोलताना जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले की, “सिकलसेल हा आजार मुळापासून नष्ट करणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर समाजाचीही जबाबदारी आहे. योग्य वेळी निदान झाल्यास या आजाराचे व्यवस्थापन करणे सुलभ होते आणि रुग्णाचे आयुष्य अधिक सुखकर होते. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली व आपल्या पाल्यांची तपासणी करून घ्यावी.”

गोंदिया जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या विशेष चमू तैनात केल्या आहेत. प्रत्येक गावात आणि शहरात ही तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा मोहिमेच्या ठिकाणी जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button