
गडचिरोली : गडचिरोली येथील सक्षम आयएएस अकॅडमीत आदिवासी प्रशिक्षण संस्था, पुणे (टीआरटीआय) अंतर्गत सुरू असलेल्या २५० विद्यार्थ्यांच्या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षण योजनेची मुदत स्टायपेंडसह आणखी ३ महिन्यांनी वाढवून द्यावी, अशी मागणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, या अकॅडमीतील विद्यार्थी नक्षलग्रस्त भागातील आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून ते पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत. जर योजनेचा कालावधी अर्ध्यातच संपला, तर आगामी पोलिस भरतीसाठी त्यांना गावी जाऊन सराव करणे शक्य होणार नाही. नक्षलवादाच्या भीतीमुळे सरावात अडचणी येतील, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वयवाढ झालेल्या मुलांना पोलिस भरतीसाठी शेवटची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने आपले आश्वासन पाळावे, अशी भावना विद्यार्थ्यांची आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी अंतिम टप्प्यात असतानाही प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. अनिवासी प्रशिक्षण असल्यामुळे मिळणारा मासिक भत्ता १० हजार रुपयेही गेल्या ३ महिन्यांपासून मिळालेला नाही. याव्यतिरिक्त, साधनसामग्री (किट) साठीचे ५० हजार रुपये देखील आदिवासी प्रशिक्षण संस्थेने अजूनपर्यंत बँक खात्यावर जमा केलेले नाहीत. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अकॅडमीतील काही विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य पोलिस भरतीसाठी त्यांच्या सरावात आणि अभ्यासात कोणताही खंड पडू नये, यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनात केली आहे. सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल या विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.



