
चामोर्शी : तालुक्यातील कुनघाडा रयतवारी आणि तळोधी येथे अवैध दारूविक्री विरोधात पोलिस विभाग, मुक्तिपथ टीम आणि गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरीत्या अहिंसक कृती केली आहे. या कारवाईत एकूण १०,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन महिला दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही गावांमध्ये अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिलांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गाव संघटनेच्या जागरूकतेमुळे गावात दारूविक्रीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले असले, तरी काही विक्रेते अजूनही चोरट्या मार्गाने आपली अवैध विक्री सुरूच ठेवून होते. अशातच, या दोन्ही गावांमध्ये काही ठिकाणी लपून-छपून दारूविक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना व मुक्तिपथ टीमला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तिपथच्या संयुक्त पथकाने कुनघाडा रयतवारी आणि तळोधी येथे अचानक धाडसत्र राबविले. या कारवाई दरम्यान दोन वेगवेगळ्या घरांची झडती घेतली असता, तिथे देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. पथकाने घटनास्थळावरून १० हजार ४०० रुपये किमतीची दारू जप्त करून ती नष्ट केली. तसेच अवैध दारू बाळगल्याप्रकरणी संबंधित दोन महिलांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत.
ही धडक कारवाई चामोर्शी पोलिस स्टेशनचे एएसआय कोडाप, पोलिस शिपाई सरका दुर्गम यांच्यासह मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे, आनंद सिडाम आणि विनोद पांडे यांनी मिळून केली. या कारवाईमुळे गावातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, गावातील दारूमुक्तीच्या चळवळीला आणखी बळ मिळाले आहे



