
भामरागड तालुक्यातील धक्कादायक घटना
गडचिरोली : पोळा सणाच्या आनंदाला जिल्ह्यात एका अत्यंत दुःखद घटनेने गालबोट लागले आहे. पोळ्याच्या सुट्टीसाठी शाळेतून घरी आलेला ६ वर्षांचा रिशान प्रकाश पुंगाटी हा चिमुकला भामरागड तालुक्यात गावालगतच्या नाल्यात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. रिशानचा मृतदेह गावापर्यंत आणण्यासाठी गावकऱ्यांना तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला.
कोयर गावातील रहिवासी असलेला रिशान, लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत पहिलीत शिकत होता. पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी त्याचे वडील त्याला घरी घेऊन आले होते. पण २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तो खेळता खेळता गावालगतच्या नाल्याजवळ गेला आणि वाहून गेला. बऱ्याच वेळापर्यंत तो घरी न आल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही.
२२ ऑगस्ट रोजी सकाळी महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. तेव्हा नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. रिशानचा मृतदेह गावापर्यंत आणण्यासाठी नाला पार करणे आवश्यक होते, मात्र त्यावर पूल नव्हता. त्यामुळे, गावकऱ्यांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून जीव मुठीत धरून मृतदेह घेऊन जावे लागले. या घटनेने स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्याची अजूनही ही अवस्था आहे.
भामरागड तालुक्यातील तिसरी घटना
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रिशानच्या घटनेच्या आधी, १८ ऑगस्ट रोजी लालचंद कपिलसाय लकडा (वय १९) हा तरुण खंडी नाला पार करताना वाहून गेला होता. त्याच दिवशी मुख्याध्यापक असंतु सोमा तलांडी हे सिपनपल्ली नाल्यात वाहून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता.
ही दुर्दैवी घटना पुन्हा एकदा प्रशासनासमोर नदी-नाल्यांवरील पुलांच्या कमतरतेचा प्रश्न उभा करते. पावसाळ्यात असे जीवघेणे प्रवास टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.



