भंडाराविदर्भ

तलावाकाठी रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह ; महिनाभरापूर्वीच जामिनावर आला होता बाहेर

पोक्सो गुन्ह्यातील पार्श्वभूमी आणि जुन्या वादातून हत्येचा संशय; फॉरेन्सिक व श्वान पथकाकडून घटनास्थळाची पाहणी.

भंडारा : जिल्ह्यातील साकोली शहरात शुक्रवारी (२२ मे) सकाळी एका ३० वर्षीय युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून ही निघृण हत्या केली असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावाच्या काठावर आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. निखिल राजकुमार कांबळे (वय ३०, मूळ रा. मुरपार-लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे मृत युवकाचे नाव असून, तो एका बलात्कार व पोक्सो (POCSO) गुन्ह्यातून महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, साकोली शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलावाच्या काठावर सकाळी काही युवक नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना निखिलचा अस्ताव्यस्त पडलेला मृतदेह दिसून आला. मृतदेहाच्या जवळच त्याची मोटरसायकल (क्रमांक MH 40 K 5099) आणि एक बॅग विखुरलेल्या अवस्थेत आढळली. निखिलच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या गंभीर व खोल जखमा होत्या.

निखिल कांबळे हा मूळचा सडक अर्जुनी तालुक्यातील असला, तरी गेल्या काही महिन्यांपासून तो साकोलीतील पंचशील वॉर्डात भाड्याच्या खोलीत राहत होता. तो साकोली येथील एका वाईन शॉपमध्ये सुमारे ८ हजार रुपये महिना पगारावर काम करायचा. २१ मे रोजी तो आपल्या गावी गेला होता. तिथे कुटुंबीयांसोबत रात्रीचे जेवण करून साडेआठ वाजताच्या सुमारास तो साकोलीला परतण्यासाठी मोटारसायकलने निघाला होता. मात्र, साकोलीत पोहोचण्यापूर्वी किंवा पोहोचल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याचा घातपात करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलविरुद्ध गोंदिया जिल्ह्यातील डुगीपार पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो तुरुंगात होता आणि अवघ्या महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटून बाहेर आला होता. या गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि त्यातून निर्माण झालेले वैर लक्षात घेता पोलिसांनी तपासाची दिशा त्या बाजूने वळवली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून साकोली पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक (फॉरेन्सिक लॅब) टीम आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तू, निखिलचे मोबाईल फोन कॉल्स, त्याचे शेवटचे लोकेशन आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी या सर्व तांत्रिक अंगांनी पोलीस कसून तपास करत आहेत. साकोलीचा हा तलाव परिसर रात्रीच्या वेळी अतिशय निर्जन असतो, त्यामुळे आरोपींनी याच संधीचा फायदा घेतला असावा. “तपासाचे धागेदोरे हाती लागत असून, आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील,” असा विश्वास साकोली पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button