
शालीनीताई मेघे रुग्णालय आणि पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम; २०२१ पासून आतापर्यंत ४२,५०० हून अधिक नागरिकांना आरोग्य कवच.
सिरोंचा : नक्षलवादाचा बीमोड करण्यासोबतच जनसामान्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असलेल्या गडचिरोली पोलीस दलाने दुर्गम भागातील नागरिकांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ आणि विविध कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाने शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मे रोजी ‘उपपोस्टे बामणी’ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या शिबिरामुळे आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या अतिदुर्गम भागातील शेकडो नागरिकांना घरपोच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे मिळवणे सोपे झाले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये शालीनीताई मेघे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊराव नाखले (मेडीसीन प्रोफेसर), डॉ. रितिक राज दास, डॉ. रुद्रप्रसाद कोरवी (कम्युनिटी मेडिसीन) आणि मेडिकल वर्कर राहुल कुमरे यांच्या चमूने रुग्णांची बारकाईने तपासणी केली.
दिवसभरात बामणी परिसरातील सुमारे १७० नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आला. तसेच कुपोषण व आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या १८ नागरिकांना पुढील अद्ययावत उपचारासाठी शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथे पाठविण्यात आले असून, त्यांच्यावर तिथे मोफत उपचार केले जाणार आहेत.
दुर्गम भागात आरोग्य क्रांती घडवून आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने गेल्या पाच वर्षांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे: आरोग्य मेळावे: सन २०२१ पासून आजपर्यंत एकूण २०० आरोग्य मेळावे आयोजित करून तब्बल ४२,५०० पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. रक्तदान मोहीम: एकूण ५ मोठ्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. ऑपरेशन रोशनी: या अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ९,९७१ हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, १,४१२ अंध व वृद्ध नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्यात आली आहे.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात उपपोस्टे बामणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रमोद कुरसुंगे, पोलीस उपनिरीक्षक (PSI) आलोक ठाकूर आणि सर्व पोलीस अंमलदारांनी मोलाचे सहकार्य केले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे बामणी परिसरातील आदिवासी बांधवांनी पोलीस दलाचे मनापासून आभार मानले आहेत.



