भंडाराविदर्भ

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरूकता दिन’ उत्साहात; भव्य रॅली व प्रबोधनात्मक शिबिराचे आयोजन

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी दाखविली रॅलीला हिरवी झेंडी; ‘असर समूह‘ व ‘पीएलव्ही‘ कडून प्रभावी पथनाट्य सादर

भंडारा : राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा येथे ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरूकता दिना’निमित्त भव्य रॅली आणि प्रबोधनात्मक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा विशेष उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा अधिवक्ता संघ, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, नर्सिंग कॉलेज, भारतीय अनुसंधान संस्था, महाबोधी एज्युकेशन सोसायटी, जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, योगभारती बहुउद्देशीय संस्था आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय व अशासकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने १५ जून रोजी समाजकल्याण भवन येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या विशेष दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, भंडारा येथून एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून याचे रीतसर उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायालयीन अधिकारी, अधिवक्ता गण, कर्मचारी वर्ग तसेच नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या मुख्य मार्गावरून फिरत या रॅलीचा समारोप समाजकल्याण कार्यालय येथे झाला.

रॅलीनंतर समाजकल्याण भवन येथे ज्येष्ठ नागरिक जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे मुख्य आकर्षण ‘असर समूह’ आणि ‘पी. एल. व्ही.’ (न्यायमित्र) यांनी सादर केलेले प्रभावी पथनाट्य ठरले. तसेच दोन विशेष नाट्यीकरणेही सादर करण्यात आली. या कलाकृतींच्या माध्यमातून आजच्या समाजात ज्येष्ठ नागरिकांशी कशा प्रकारे दुर्व्यवहार केला जातो आणि तो कसा रोखला पाहिजे, याचे अत्यंत बोलके चित्र उपस्थितांसमोर उभे करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलिंदकुमार बुराडे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ याविषयी सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ज्येष्ठांना दिल्या जाणाऱ्या विविध मोफत विधी सेवांची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन रहांगडाले यांनी मार्मिक भाषणात सांगितले की, “आपण आज आपल्या घरातील वृद्ध लोकांशी जसा व्यवहार करू, तसेच उद्या आपण म्हातारे झाल्यावर आपली मुले आपल्याशी वागतील. त्यामुळे आपल्या ज्येष्ठांशी नेहमी सन्मानाने व आदराने वागण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे.” समाजकल्याण कार्यालयाचे अधिकारी वसंतसिंग बलवणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय कल्याणकारी योजना आणि कायद्यांचे सविस्तर विश्लेषण केले.

या कार्यक्रमाला मुख्य न्यायरक्षक भारत गभणे, उपमुख्य न्यायरक्षक इकबाल सिद्धिकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक केशव चावरे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांमधील डॉ. वानखेडे, मनोहर गणवीर, साठवणे यांच्यासह सर्व शासकीय व अशासकीय संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुप्रिया गजभिये यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. आशा वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया गजभिये, धनश्री हातझाडे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व न्यायमित्रांनी (पी.एल.व्ही.) परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button