
अधिवेशनात आ. सुधाकर अडबाले यांच्या लक्षवेधीवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासन ; वेतन पथक अधीक्षकांवरही कारवाई
नागपूर : भंडारा जिल्हा परिषदेतील (ZP) शिक्षण विभागातील अनियमिततेवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा पदभार तातडीने काढून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत या पदावर कायमस्वरूपी शिक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती मंत्री भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनांवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उत्तर देत होते. मंत्री भुसे म्हणाले की, प्रशासनिक पातळीवर तातडीने निर्णय घेण्यात आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित भंडारा जिल्हा परिषद येथील वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) यांचाही पदभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची पुनःचौकशी केली जाईल आणि त्या आधारावर दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल.
चौकशीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी झाली, याची सविस्तर माहिती घेऊन नव्याने करण्यात येणाऱ्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे भंडारा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कामकाजाला शिस्त लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



