जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? : डॉ. कोरेट्टी
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तपासणीपासून अनुदानापर्यंत चौकशीची मागणी

गडचिरोली, दि 20 ऑगस्ट :- धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात केवळ संस्थाचालकांवर कारवाई न करता आश्रमशाळेची तपासणी करणारे अधिकारी, अनुदान मंजूर व वितरित करणारी यंत्रणा तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी जय सेवा युवा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष डॉ. आशिष मनोहर कोरेट्टी यांनी केली.
पत्रकार परिषदेत डॉ. कोरेट्टी यांनी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत विविध मागण्या मांडल्या. आश्रमशाळेची नियमित तपासणी करण्यात आली होती का, विद्यार्थिनींची निवासव्यवस्था सुरक्षित होती का, स्वच्छता, खाटा, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आश्रमशाळेच्या परिसराची पाहणी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या तीन ते पाच वर्षांत आश्रमशाळेला मिळालेल्या देखभाल व परिरक्षण अनुदानाचा तसेच प्रत्यक्ष झालेल्या खर्चाचा हिशेब सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली. यासाठी खर्चाची बिले, व्हाउचर, उपयोगिता प्रमाणपत्रे आणि संबंधित तपासणी अहवालांची तपासणी करण्याची मागणी प्रतिष्ठानने केली आहे.
या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल झाला असला तरी केवळ त्यावर प्रकरण थांबता कामा नये, असे डॉ. कोरेट्टी यांनी स्पष्ट केले. आश्रमशाळेची यापूर्वी तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका, त्यांनी दिलेले तपासणी अहवाल आणि शासकीय अनुदानाचा झालेला वापर यांचीही चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची विशेष सानुग्रह मदत द्यावी, तसेच जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. जपतलाई परिसरातील रस्त्यांचे तांत्रिक ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले.
जपतलाईच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांचे स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करण्यात यावे. प्रत्येक आश्रमशाळेत स्थानिक विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी जय सेवा युवा प्रतिष्ठानने केली आहे.
आश्रमशाळांच्या सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थेबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
“तीन मुलींचा मृत्यू विसरला जाणार नाही. दोषी कोणताही असो, त्याला कायद्यापुढे आणले पाहिजे. या प्रकरणात ठोस निर्णय न झाल्यास लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा डॉ. कोरेट्टी यांनी दिला.
पत्रकार परिषदेला आरती कोल्हे, वनिता ताराम, शारदा मडावी, डॉ. प्रशांत उईके, सारंग जांभुळे, शिवकुमार भैसारे, श्रीकांत आतला, श्रेयश नैताम आदी उपस्थित होते.



