बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान!

विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रँड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची, विशेषतः महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महाराष्ट्राची पहिली विश्वविजेती ग्रँडमास्टर म्हणून दिव्याने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यासोबतच, उपविजेत्या ठरलेल्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, “बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती, हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग आहे.”
आपल्या अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्याने भारतीय विक्रम नोंदवला आहे. ती महिला कॅंडीडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरली आहे. यासोबतच, ती आता भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. आतापर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० वेळा भारताचे प्रतिनिधित्व करत, ३५ वेळा पदक पटकावले आहे. यात तब्बल २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ ब्राँझ पदकांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदासाठी दोन भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षवेधी झुंज जगासाठीही उत्कंठावर्धक ठरली, हे विशेष मानावे लागेल. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप महत्त्वाची आहे. दिव्या आणि कोनेरू यांच्या पटावरील चाली तोडीस तोड होत्या. या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे.”
हे यश भारतातल्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणादायी ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. “हे यश भारताच्या क्रीडा लौकिकात भर घालणारे आहे. या यशासाठी दिव्या आणि कोनेरू यांचे मनापासून अभिनंदन. ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांची विश्वविजेती कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी असा क्षण आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिव्याच्या सातत्यपूर्ण यशासाठी मेहनत घेणारे प्रशिक्षक-मार्गदर्शक तसेच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई-वडील व देशमुख परिवारातील सर्वांचेही मनापासून अभिनंदन केले. “ग्रँडमास्टर दिव्याकडून यापुढे कॅंडीडेट्स स्पर्धेतही असाच विजय साकारला जाईल असा विश्वास आहे. त्याकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.



