
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढत्या वाहतूक व्यवस्थेतील दडपण तसेच वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरासाठी स्वतंत्र बायपास रस्त्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे. या आवश्यकतेची दखल घेत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले.
गडचिरोली हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व आकांक्षित जिल्हा असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून या भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे या भागात राष्ट्रीय महामार्गांचे मजबूत जाळे उभे राहिले असून, त्यामुळे संपर्क व वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. यासाठी जिल्हावासीयांनी गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गडचिरोली दौऱ्यावर असताना नितीन गडकरी यांनी गडचिरोली शहरासाठी बायपास रस्ता अत्यावश्यक असल्याचे मान्य करत यास तात्काळ मंजुरी दिली जाईल, असे सार्वजनिक आश्वासन दिले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्हा छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडतो. तसेच, कोनसरी व सुरजागडसारख्या औद्योगिक प्रकल्पांमुळे जिल्ह्यांतर्गत वाहतुकीचा भार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. याचा थेट परिणाम शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक दडपण आणि अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहराला वळसा घालणारा स्वतंत्र बायपास मार्ग ही काळाची गरज ठरली आहे.
या निवेदनाद्वारे माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी बायपास रस्त्याच्या तात्काळ मंजुरीसह आवश्यक निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. “गडचिरोलीच्या नागरी विकासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. नक्कीच हे काम मा. नितीनजी गडकरी साहेब पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास देखील मी व्यक्त करतो,” असे डॉ. नेते यांनी यावेळी सांगितले.
या महत्त्वपूर्ण निवेदन प्रसंगी प्रामुख्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, सामाजिक नेते धनंजय पडीशाल्लवार, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, युवा नेते सारंग साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



