क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

लाचखोर क्षेत्र सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात ; १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

गडचिरोली : वनजमिनीवर अवैधपणे काम केल्याचा आरोप करत जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिरोंचा वनविभागातील क्षेत्र सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) कमलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली.

तक्रारदार हे तेलंगणा राज्यातील रहिवासी असून, ते राजाराम (खां) परिसरात आपल्या काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत करत होते. दरम्यान, दोन वनरक्षकांनी ‘वनजमिनीवर अवैध काम’ केल्याचा ठपका ठेवत त्यांचा ट्रॅक्टर जप्त केला होता. हा जप्त केलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी आणि त्यावर कमी दंड आकारण्याच्या बदल्यात राजाराम उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक महेश जयंतराव धामनगे (वय ४७) यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत सगणे यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. अत्यंत संवेदनशील आणि नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या राजाराम (खां) गावात एसीबीने सापळा रचला आणि धामनगे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. अटकेनंतर आरोपीच्या राजाराम आणि चंद्रपूर येथील निवासस्थानांची गडचिरोली व चंद्रपूर एसीबी युनिटकडून झडती घेण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक विक्रांत सगणे, पोलीस निरीक्षक किरण बगाटे, किशोर जौंजारकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

“कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा दलालाने कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस उप अधीक्षक विक्रांत सगणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button