
१२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलनाचा इशारा ; काँग्रेसचा शासनावर हल्लाबोल
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यूप्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेने आता रौद्र रूप धारण केले आहे. शासनाने ११ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणाच्या निर्णयाचा (GR) निषेध म्हणून शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी भेंडाळा येथे या आदेशाची जाहीर ‘होळी’ करून संताप व्यक्त केला. “आमची जमीन, आमचा अधिकार” अशी गर्जना करत शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा धिक्कार केला.
या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “शासनाला शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावाने बळकावून त्यांना भूमिहीन करायचे आहे. स्थानिक ग्रामसभांना विश्वासात न घेता आणि पर्यावरणाचा विचार न करता लादलेला हा निर्णय लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारा आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा नाश करणारा विनास आहे.”
केवळ होळी करून हे आंदोलन थांबणार नाही, तर प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलकांनी पुढील पाऊल उचलले आहे. जर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तात्काळ थांबवली नाही, तर १२ मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन केले जाईल. निषेध म्हणून शेतकरी ‘मुंडन’ करून सरकारचा निषेध नोंदवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
भेंडाळा परिसरातील जमिनी अत्यंत सुपीक आणि उत्पादनक्षम आहेत. या जमिनी गेल्यास शेतकऱ्यांकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन उरणार नाही. “संमतीशिवाय जमीन अधिग्रहण” ही भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर यांच्यासह कविताताई भगत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम आणि शेकडो काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, भेंडाळा परिसरातील हजारो शेतकरी बांधव आणि भगिनींनी या आंदोलनात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून दिली.
भेंडाळा परिसरातील या आंदोलनामुळे प्रशासन आणि प्रस्तावित कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. १२ मार्चच्या मुंडन आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पोलीस आणि महसूल विभाग सतर्क झाला असून, यावर शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



