गडचिरोलीविदर्भ

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’निमित्त १५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम ; तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून प्रभावी समुपदेशन

गडचिरोली : अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ आणि ‘जागतिक उच्चरक्तदाब दिना’चे औचित्य साधून २९ मे रोजी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य जनजागृती आणि मोफत तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली) आणि गडचिरोली पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कल्याणकारी उपक्रम पोलीस मुख्यालयात पार पडला. हे शिबिर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडले. या विशेष प्रबोधनपर चर्चासत्रात आणि तपासणी मोहिमेत तब्बल १५० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) स्वप्नील इज्जपवार यांनी उपस्थित खाकी वर्दीतील जवानांना मार्गदर्शन केले. “पोलीस दलातील नोकरी ही अत्यंत आव्हानात्मक आणि तणावाची आहे. अशा परिस्थितीत आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तंबाखू व इतर घातक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

चर्चासत्रादरम्यान राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत यांनी तंबाखूच्या सेवनामुळे शरीरावर होणारे घातक परिणाम, कॅन्सरसारखे गंभीर आजार आणि आरोग्याची होणारी हानी यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ खैरकर यांनी व्यसनाधीनतेच्या चक्रात अडकल्यामुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे विश्लेषण केले. केवळ औषधोपचारच नव्हे, तर व्यसनमुक्तीसाठी स्वतःचे ‘मानसिक सक्षमीकरण’ किती गरजेचे आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले.

प्रबोधनपर सत्रानंतर उपस्थित सर्व १५० कर्मचाऱ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये डेंटल हायजिनिस्ट रीना मेश्राम आणि खेमचंद वाढई यांनी कर्मचाऱ्यांची मौखिक (तोंड व दात) तपासणी केली, जेणेकरून कॅन्सरपूर्व लक्षणांचे वेळेत निदान करता येईल.

तंबाखूचे व्यसन असलेल्या कर्मचाऱ्यांचे मीना दिवटे यांच्याकडून प्रभावी समुपदेशन करण्यात आले. तसेच, आधुनिक जीवनशैलीत पोलिसांमध्ये वाढणाऱ्या रक्तदाबाचा वेध घेण्यासाठी राहुल चावरे, वैशाली बोबाटे, शीतल काळबांधे व भूपेश दरडमारे यांच्या वैद्यकीय पथकाने सर्व कर्मचाऱ्यांची उच्चरक्तदाब आणि मधुमेह तपासणी करून आवश्यक तो वैद्यकीय सल्ला दिला.

कर्तव्य बजावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस बांधवांसाठी हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरला. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल आणि त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button