गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अबुझमाड चकमकीत ७३ लाखांचे बक्षीस असलेल्या ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा

दुर्दैवाने एक जवान शहीद, तर एक जखमी ; ५ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त

गडचिरोली : अबुझमाडच्या घनदाट जंगलात गडचिरोली पोलिसांनी सलग तीन दिवस राबवलेल्या धाडसी मोहिमेत ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या चकमकीत ७३ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ‘प्रभाकर’ याच्यासह कंपनी क्र. १० आणि छत्तीसगडमधील इतर दलमचे कमांडर मारले गेले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मात्र, या शौर्यपूर्ण लढाईत ‘प्राणहिता’ पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी यांना वीरमरण आले असून, एक जवान जखमी झाला आहे.

गडचिरोली आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांची ‘कंपनी क्र. १०’ आणि छत्तीसगडमधील काही तुकड्या घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या १४ तुकड्या ३ फेब्रुवारीच्या रात्रीच मोहिमेवर रवाना झाल्या. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे शोध मोहीम सुरू असताना नक्षल्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी चोख प्रत्युत्तर देत माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. ५ फेब्रुवारी रोजी अधिक कुमक (CRPF QAT) बोलावून मोहीम तीव्र करण्यात आली. या दिवशी झालेल्या चकमकीत ३ नक्षल्यांचे मृतदेह आणि एके-४७ सह शस्त्रे जप्त करण्यात आली. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा झालेल्या चकमकीत आणखी ४ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.

या मोहिमेदरम्यान ५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नक्षल्यांच्या गोळीबारात सी-६० चे जवान दीपक चिन्ना मडावी (पोशि/५२२८) हे गंभीर जखमी झाले. दुर्गम भाग असूनही त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काल गडचिरोली पोलीस मुख्यालयात त्यांना शासकीय इतमामात वीरमरणोत्तर श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जोगा मडावी हे जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभाकर ऊर्फ रवी याच्यावर चकमक, खून व इतर असे ११३ गुन्हे दाखल होते. त्याच्यावर शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. कमांडर, कंपनी क्र. ५ पागु मोडयाम याच्यावर १६ लाखांचे बक्षीस जाहीर होते. पीपीसीएम (प्रभाकरची गार्ड) अनिला ऊर्फ बुदरी हिच्यावर एकूण १२ गुन्हे दाखल होते. तिच्यावर शासनाने ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. कमांडर, स्पेशल प्लाटून माड कामेश पदा याच्यावर ८ लाख, एसीएम, परालकोट दलम भजनाथ ऊर्फ भिमा याच्यावर ६ लाख, सदस्य, कंपनी क्र. १०  मंगली कुरसाम हिच्यावर ४ लाख, तर सदस्य, कंपनी क्र. ५ जोगी सोढी-मडावी हिच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते.

घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रे: ३ एके-४७ रायफल, १ एसएलआर, १ .३०३ रायफल, ३ बीजीएल. दारूगोळा: १७३ जिवंत काडतूस, १० जिलेटीन कांड्या, २ बंडल कॉर्टेक्स वायर, ७ मॅगझिन. याशिवाय मोठ्या प्रमाणात दैनंदिन वापराचे साहित्य आणि माओवादी साहित्य जप्त झाले आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले की, २०२१ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ९९ माओवाद्यांना ठार केले असून, १४० जणांना अटक केली आहे, तर १५३ माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. त्यांनी उर्वरित माओवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले असून, नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. या शौर्यपूर्ण कामगिरीचे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांनी कौतुक केले असून संपूर्ण जिल्ह्यात जवानांच्या धाडसाची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button