गडचिरोलीविदर्भ

बेज्जुरपल्लीला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी सरसावले युवक

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या बेज्जुरपल्ली येथील तरुणांनी आपल्या गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. ‘मुक्तीपथ’ अभियान आणि स्थानिक युवा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे गावातून अवैध दारू हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

गावात काही दिवसांपासून युवा संघटनेच्या माध्यमातून दारू विक्री बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे. गावातील ५ दारू विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत ३ विक्रेत्यांनी आपला व्यवसाय कायमचा बंद केला. मात्र, उर्वरित २ विक्रेते छुप्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती युवकांना मिळाली. त्यानंतर, मुक्तीपथ उपसंघटक शंकर गग्गुरी यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेऊन युवकांनी अहिंसक कृती करण्याचे ठरवले. या मोहिमेत विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर पाहणी करून १२ बिअरच्या बाटल्या आणि १० लिटर गुळाची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. संबंधित विक्रेत्यांना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली. यापुढे विक्री सुरू ठेवल्यास मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बेज्जुरपल्ली येथे ‘मुक्तीपथ’तर्फे दोन दिवसीय सघन भेट उपक्रम राबविण्यात आला. यावेळी टीमने युवकांना संघटित करून अवैध व्यवसायाविरोधात कसे लढावे, याचे मार्गदर्शन केले. गावातील युवकांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे लवकरच बेज्जुरपल्ली हे ‘दारूविक्रीमुक्त गाव’ म्हणून ओळखले जाणार आहे. जशी बेज्जुरपल्लीच्या तरुणांनी एकी दाखवली, तशीच इतर गावांतील युवा शक्तीने पुढे येऊन आपल्या गावातून अवैध दारू हद्दपार करावी, असे आवाहन मुक्तीपथ टीमने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button