
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात नुकतीच ‘भारतीय शिक्षा दिवस’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी यावर या कार्यशाळेत सविस्तर मंथन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विभागप्रमुख डॉ. मनोज पांडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षणातील भारतीय मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “भारतीय ज्ञान परंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, मातृभाषेतून शिक्षण आणि संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक व शैक्षणिक संस्थांनी कशा प्रकारे पुढाकार घ्यावा, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा भाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. शिक्षण समाजोपयोगी व संशोधनाभिमुख करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणे आवश्यक आहे, यावर तज्ज्ञांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यासोबतच शिक्षा संस्कृती उत्थान न्यासच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सहा. प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले, तर आभार धेर्यशील खामकर यांनी मानले. भारतीय शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.



